![]() |
प्रार्थना बेहेरे
|
![]() |
पीयूष रानडे
|
लवकरच येणा-या एका नव्या हिंदी नाटकात प्रार्थना बेहेरे आणि पियूष रानडे ही जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. या निमित्ताने ही बडोद्याची मराठी जोडी हिंदी नाटकात चमकेल. विशेष म्हणजे याचं लेखन , दिग्दर्शन प्रसाद खांडेकर या मराठी तरुणाने केलं आहे.
चांगल्या बॅनरचा सिनेमा मिळाला की त्यातल्या नायक-नायिकेला इतर सिनेमांसाठी विचारणा होऊ लागते. अशांना मग एकामागून एक सिनेमे मिळत जातात. पण , ' जय महाराष्ट्र धाबा , बठिंडा ' मधली जोडी अभिजीत खांडकेकर-प्रार्थना बेहेरे ही जोडी त्याला अपवाद ठरली आहे. अभिजीतने मराठी नाटक स्वीकारलेलं आहेच. पण , त्यापाठोपाठ प्रार्थना बेहेरेही आता आगामी हिंदी नाटकामधून चमकणार आहे. तिचं हे पहिलंच नाटक असून , मूळ बडोद्याच्या असलेल्या प्रार्थनाचा हिंदीतला नायक असेल तिच्याच शहरातून आलेला मराठी कलाकार पियूष रानडे.
हे नाटक हिंदी असलं तरी याचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय ते प्रसाद खांडेकर या मराठी तरुणाने. यामध्ये अंजन श्रीवास्तव , रीमा हे कलाकारही असणार आहेत. आपल्या पहिल्या नाटकाबद्दल बोलताना प्रार्थना म्हणाली , ' यापूर्वी मी टीव्ही , सिनेमा केला होता. पण , नाटकात काम केल्यामुळे एका कलाकाराची ग्रोथ होते असं मला अनेकांनी सांगितलं. म्हणून नाटक करायचं होतंच. पियूष हा माझा चांगला मित्र आहे. त्याने माझं नाव निर्मात्याला सुचवलं. मराठीपेक्षा माझं हिंदी चांगलं आहे. नाटकात हजरजबाबीपणा लागतोच. शिवाय भाषेवर प्रभुत्वही हवं. म्हणून मी आधी हिंदी नाटक निवडलं. पुढे मराठी नाटकातही मला काम करायचंय. '
या नाटकाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. पण हा फॅमिली ड्रामा आहे. कुटुंबातल्या विसंवादावर यामध्ये तिरकस भाष्य असेल. ' या कुटुंबात ही मुलगी बाहेरुन येते आणि तिचा या फॅमिलीला त्रास होऊ लागतो. पण , सुरुवातीला नकोशी वाटणारी ही मुलगी नंतर संपूर्ण कुटुंब बदलते असं याचं सार आहे. एकदम मॉड , बबली अशी ही भूमिका आहे ,' असंही प्रार्थनाने सांगितलं. विशेष म्हणजे , यात तिचा नायक असणार आहे पियूष रानडे. त्याचं हे तिसरं व्यावसायिक नाटक. ' बडोद्यात कॉलेजमध्ये असताना मी अनेक नाटकं केली. दरम्यान मी व्यावसायिक रंगमंचावर पाय ठेवला तो गुजराती नाटकातून. त्यानंतर दुसरं हिंदी नाटक केलं आणि आता हे तिसरं. प्रार्थना बडोद्याचीच असल्याने आमची ओळख होती. शिवाय या नाटकाची गरज लक्षात घेता , तिचं नाव मी सुचवलं. नाटकातल्या फॅमिलीमधला मी मुलगा आहे. सोबत अंजन श्रीवास्तव आणि रीमा असल्याने खूप शिकायला मिळतंय. ' बडोद्यात असताना पियूषने अनेक गुजराती , हिंदी , मराठी , उर्दू प्रायोगिक नाटकांमधून काम केलंय.