Wednesday, 27 March 2013

अवघे जग झाले रंगभूमी...

मूळचे नाशिकचे असलेले पण मुंबई व त्यानंतर सातासमुद्रापार अमेरिकेमध्ये रंगभूमी गाजविणारे दीपक करंजीकर व विद्या करंजीकर हे जोडपे आजवर अभिनयाचा प्रवास नाटक, सिनेमा, कविता यांसारख्या माध्यमातून करत आहेत. जागतिक रंगभूमीदिनानिमित्त त्यांच्या या समृद्ध प्रवासाबद्धल :
लहानपणापासून विद्या करंजीकर यांना अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन जीवनात एक एकपात्री प्रयोग केल्यानंतर त्यांना सुवर्णपदक मिळालं आणि त्यामुळे व्यावसायिक नाटकात काम करण्यासाठी विचारणा झाली. नाना पाटेकरांबरोबर त्यांनी पहिलं ‘आई शप्पथ’ हे नाटक केलं. त्यानंतर दिलीप
प्रभावळकरांबरोबर ‘वट वट सावित्री’, सुधीर भटांच्या ‘ब्रम्हचारी’ यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. ब्रम्हचारी या नाटकाचे त्यांनी पहिले 187 प्रयोग केलेत. विद्या मुळच्या पार्ल्याच्या. लग्न होऊन त्या नाशिकला स्थायिक झाल्या आणि नाशिकच्या रंगभूमीला दीपक करंजीकर आणि विद्या करंजीकर हे दोन रंगकर्मी मिळालेत. दीपक करंजीकरदेखील महाविद्यालयीन जीवनापासून हौशी रंगभूमीवर काम करीत होते. ‘त्या एका वळणावर’ हे दोघांची भूमिका असलेले व्यावसायिक नाटक अत्यंत गाजले. कॅलिफॉर्निया आर्ट असोसिएशन या संस्थेद्वारा त्यांनी महेश एलकुंचवारांचे ‘वाडा चिरेबंदी’ नाटक तसेच अनेक एकांकिका केल्या. मराठीबरोबरच इंग्रजी व हिंदी नाटकांमध्ये काम केले. असोसिएशानद्वारा त्यांनी कवितेचा आॅपेरा म्हणजे सत्तर वर्षांमधले कवी व त्यांच्या शंभर कवितांवर आधारित नाट्यमय कार्यक्रम त्यांनी केला. याचबरोबर त्यांनी आठ इंग्रजी नाटके, सहा हिंदी नाटके व आठ-दहा मराठी नाटके या असोसिएशनमार्फत सादर केली. मराठीमध्ये विजय तेंडुलकरांचे ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘सावर रे’ आदी नाटकांना तिथल्या मराठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याशिवाय त्यांनी एव्हरीवन लव्हज द गुड त्सुनामी, व्हेअर देअर इज अ विल हे महेश दत्तानी या इंग्रजी लेखकाचे नाटक अशी अनेक नाटके सादर केली.
कॅलिफॉर्नियामध्ये भारतातून स्थायिक झालेली मराठीपेक्षा हिंदी लोकसंख्या जास्त आहे. नाटकची कवितेशी असलेली जवळीक लक्षात घेऊन त्यांनी मराठीतल्या 22 कवींच्या ग्रेस, कोलटकर, बहिणाबाई, विंदा करंदीकर यांच्या हिंदीत भाषांतरित कविता सादर केल्या याशिवाय नाटक करण्यास पूरक अशा देहबोलीच्या कार्यशाळा त्यांनी तिथे घेतल्या. तिथल्या इंग्रजाळलेल्या व भारतीय संस्कृती व समस्यांशी अनभिज्ञ असलेल्या नव्या भारतीय पिढीला त्यामुळे मराठी, हिंदी नाटकांची समृद्ध परंपरा कळण्यास मदत झाली.

No comments:

Post a Comment