Thursday, 2 May 2013

‘झालाच पाहिजे!’चा दिमाखदार शुभारंभ

बेळगावमधील मराठी माणसांवरील अत्याचारावर प्रकाश टाकणा-या ‘झालाच पाहिजे!’ या नाटकाच्या शुभारंभाचा देखणा सोहळा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर बुधवारी षण्मुखानंद सभागृह येथे झाला.
मुंबई- बेळगावमधील मराठी माणसांवरील अत्याचारावर प्रकाश टाकणा-या ‘झालाच पाहिजे!’ या नाटकाच्या शुभारंभाचा देखणा सोहळा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर बुधवारी षण्मुखानंद सभागृह येथे झाला. या प्रयोगाला ‘स्वाभिमान’ संघटनेचे प्रमुख आणि ‘महाराष्ट्र कलानिधी’चे मुख्य प्रवर्तक नितेश राणे, ‘नाटय़संपदा’चे अनंत पणशीकर, चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजेरकर, आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पहिला प्रयोग पाहण्यासाठी सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. नाटकाला येणा-या प्रेक्षकांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. नाटकातील एक कलाकार सुबोध भावे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर नाटकाचा नेत्रदीपक प्रयोग सादर झाला. बेळगाववासीयांचे दु:ख मांडणा-या या नाटकातील प्रसंगांनी प्रेक्षक हेलावून गेले. सुबोध भावे, सविता मालपेकर, हेमंत ढोमे, मानसी सिंग, रमेश वाणी, अनिल रसाळ, संदेश उपशाम या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
या प्रसंगी नितेश राणे म्हणाले, बेळगाववासीय जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सार्थकी लागणार नाहीत. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झाला असता आणि मुंबईचा महाराष्ट्रात समावेश झाला नसता, तर मुंबईकरांचे काय झाले असते, असा सवाल त्यांनी प्रेक्षकांना केला. १ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारकाला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेने एकत्र येऊन हुतात्म्यांनी सुरू केलेली संयुक्त महाराष्ट्राची लढाई पुढे सुरू ठेवायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश मांजरेकर यांनी नाटकाचे कौतुक करत सांगितले की, सध्या प्रत्येक वर्तमानपत्रातील पहिल्या पानावर बिल्डरांच्या जाहिराती पाहायला मिळतात. परंतु, आज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर ‘झालाच पाहिजे!’ची जाहिरात पाहून बरे वाटले. या नाटकामुळे विस्मरणात गेलेल्या प्रश्नावर पुन्हा प्रकाश टाकला जाणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

मराठी रंगभूमीवर 'नांदी' अवतरणार

मुंबई : तब्बल दीडशे वर्षांहून जास्त परंपरा असलेल्या मराठी रंगभूमीवर सध्या अनेक प्रयोग होत आहेत. रंगभूमीवर ट्रेनचा अख्खा डबा उभा करण्यापासून ते जुनी नाटके पुनरुज्जीवित करण्यापर्यंत अनेक गोष्टी घडत आहेत. मात्र या दीडशे वर्षांत प्रत्येक दशकात मैलाचा दगड ठरलेल्या एकेका नाटकाचा आधार घेऊन त्या अनुषंगाने आजच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक परिस्थितीवर भाष्य करणारे एखादे नाटक आले तर? विचारानेच गंमत वाटते ना! पण मराठी नाटय़सृष्टीतील चार निर्माते एकत्रितपणे असे नाटक घेऊन येत आहेत. हृषिकेश जोशी लिखित आणि दिग्दर्शित 'नांदी' या नाटकाच्या माध्यमातून काळाच्या पुढे आणि काळाच्या मागे जाऊन नाटकांमधील या स्थित्यंतराचा वेध घेतला आहे.
हृषिकेशला २००३ ते २००५ या काळात केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. या शिष्यवृत्तीअंतर्गत तो 'मराठी रंगभूमीवरील वाचिक अभिनयाचा प्रवास' या विषयावर संशोधन करत होता. या संशोधनादरम्यान अनेक नाटकांचे वाचन करण्याचा योग आला. रंगभूमीच्या इतिहासाच्या टप्प्याटप्प्यावर लिहिल्या गेलेल्या नाटकांत अनेक साम्यस्थळे आढळली. त्यातून या नाटकाची संकल्पना सुचल्याचे हृषिकेशने 'वृत्तांत'शी बोलताना सांगितले. आता हे नाटक दिलीप जाधव, प्रसाद कांबळी, चंदू लोकरे आणि संज्योत वैद्य हे चार निर्माते एकत्र येत रंगभूमीवर आणत आहेत.
या काळात प्रत्येक दशकात मैलाचा दगड ठरलेले एक नाटक घेऊन आपण त्यातील प्रसंग आजच्या काळाशी बांधले आहेत. यात 'अभिज्ञान शाकुंतलम्'पासून ते 'चाहुल'पर्यंत अनेक नाटकांचा समावेश केला आहे. त्यातील प्रसंगांचा विचार करून त्याभोवती आपण नाटय़ रचले आहे, असे हृषिकेशने सांगितले. सध्या समाजात जे प्रकार घडत आहेत, त्याबाबत फक्त चर्चा केल्या जातात. पण त्याच्या मूळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही. या नाटकाच्या माध्यमातून आपण नेमका तोच प्रयत्न केल्याचे त्याने स्पष्ट केले.
या नाटकात शरद पोंक्षे, अविनाश नारकर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, हृषिकेश जोशी, अश्विनी एकबोटे, सीमा देशमुख, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी असे दहा कलाकार काम करत आहेत.
हे दहा कलाकार नाटकांत एकूण २३ भूमिका पार पाडतील. त्याशिवाय प्रदीप मुळ्ये यांनी नाटकाचे नेपथ्य आणि प्रकाशयोजना केली असून राहुल रानडे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. संगीत नाटकांपासून ते समांतर नाटकांपर्यंतचा नाटय़सृष्टीचा आणि काळाचाही प्रवास १२ मेपासून रंगभूमीवर येत आहे.