Thursday, 2 May 2013

‘झालाच पाहिजे!’चा दिमाखदार शुभारंभ

बेळगावमधील मराठी माणसांवरील अत्याचारावर प्रकाश टाकणा-या ‘झालाच पाहिजे!’ या नाटकाच्या शुभारंभाचा देखणा सोहळा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर बुधवारी षण्मुखानंद सभागृह येथे झाला.
मुंबई- बेळगावमधील मराठी माणसांवरील अत्याचारावर प्रकाश टाकणा-या ‘झालाच पाहिजे!’ या नाटकाच्या शुभारंभाचा देखणा सोहळा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर बुधवारी षण्मुखानंद सभागृह येथे झाला. या प्रयोगाला ‘स्वाभिमान’ संघटनेचे प्रमुख आणि ‘महाराष्ट्र कलानिधी’चे मुख्य प्रवर्तक नितेश राणे, ‘नाटय़संपदा’चे अनंत पणशीकर, चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजेरकर, आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पहिला प्रयोग पाहण्यासाठी सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. नाटकाला येणा-या प्रेक्षकांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. नाटकातील एक कलाकार सुबोध भावे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर नाटकाचा नेत्रदीपक प्रयोग सादर झाला. बेळगाववासीयांचे दु:ख मांडणा-या या नाटकातील प्रसंगांनी प्रेक्षक हेलावून गेले. सुबोध भावे, सविता मालपेकर, हेमंत ढोमे, मानसी सिंग, रमेश वाणी, अनिल रसाळ, संदेश उपशाम या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
या प्रसंगी नितेश राणे म्हणाले, बेळगाववासीय जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सार्थकी लागणार नाहीत. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झाला असता आणि मुंबईचा महाराष्ट्रात समावेश झाला नसता, तर मुंबईकरांचे काय झाले असते, असा सवाल त्यांनी प्रेक्षकांना केला. १ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारकाला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेने एकत्र येऊन हुतात्म्यांनी सुरू केलेली संयुक्त महाराष्ट्राची लढाई पुढे सुरू ठेवायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश मांजरेकर यांनी नाटकाचे कौतुक करत सांगितले की, सध्या प्रत्येक वर्तमानपत्रातील पहिल्या पानावर बिल्डरांच्या जाहिराती पाहायला मिळतात. परंतु, आज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर ‘झालाच पाहिजे!’ची जाहिरात पाहून बरे वाटले. या नाटकामुळे विस्मरणात गेलेल्या प्रश्नावर पुन्हा प्रकाश टाकला जाणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

2 comments: