Monday, 11 February 2013

दगडमातीतील मूर्तीसह शोधली मूर्ती कलाकारातील

 पीयूष नाशिककर । नाशिक
कधी इतरांचा चेहरा रंगवला, कधी स्वत:च मुखवटे लावून उभे राहिले.  लेखक, दिग्दर्शकही झाले. 45 वर्षे राज्य नाट्यस्पर्धा गाजवली. ते ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर.. नाशिककरांचे दादा. 85 व्या वर्षातही तरुणांना लाजवणारे त्यांचे काम. त्यांच्या कारकीर्दीवर हा ‘स्पॉटलाइट’.

अमृतधाम परिसरातील आपली मूर्तीशाळेत कामात दंग दादा.
०    दादा तुम्ही कलाक्षेत्राकडे कसे वळलात?
    - दगडी मूर्तीकाम करणे हीसुद्धा एक कलाच आहे. आमच्या घरातील बुजुर्ग मंडळी हेच काम करीत. पंचवटीच्या पाथरवट लेनमध्ये राहताना आठ महिने मजुरी करून पावसाळ्यात घरी परतणारी माणसे आसपास रहायची. त्या चार महिन्यांत करमणुकीचे साधन काय? मग गाणी लिहायची, नृत्य. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच काम करू लागलो.
०    तुम्ही तळागाळातील माणसांना नाटक शिकवले...
    - कलाकार कुठून हो आणणार? आहे त्या मजुरांनाच उभे करायचे. बरं.. सगळे आंगठे बहाद्दर. मग आपणच वाचून दाखवायचे. उपाशी रहायचो, पण नाटक कारायचो.
०    पूर्वी स्त्री पात्र मिळायचे नाही..
    - मुलींना पालक कामच करू द्यायचे नाहीत. आई-वडील नसलेली एक मुलगी तयार झाली. तालमीला उशीर व्हायचा. तिला सोडायला जावे लागायचे. ते ‘लाल कंदील’ नावाचे नाटक होते. त्या मुलीला पहिले पारितोषिकही मिळाले होते. काही वर्षांनी मग मी माझ्या नंदा रायते या मुलीलाच नाटकात उभे केले. आता बिटको कॉलेजला प्राध्यापिका आहे.
०    विजय नाट्य मंडळ कसे स्थापन झाले?
    - नरसिंह व्यायामशाळा हीच आमची संस्था. 15 आॅगस्ट 1948 रोजी विजय नाट्य मंडळाची स्थापना केली. गणेशोत्सवात ‘नावीन्य विजय मेळा’ या नावाने मेळ्यांतून सहभागी व्हायचो. तोपर्यंत स्वत: काही लिहीत नव्हतो. वाचनाच्या आवडीतून माझ्यातील लेखक जागा झाला.
०    तुम्ही स्पर्धेकडे कधी वळलात?
    - 1959 साली मी ‘मानाचा जरीपटका’ लिहिले. त्यावेळच्या नाशिकच्या नाट्यसंघात मोहनराव करंदीकर, आनंद सबनीस, तात्यासाहेब कार्यरत होते. एका नाटकासाठी मला नेपथ्य, संगीतासाठी बोलावले.  पुढे सबनीस म्हणाले की, तुम्हीही राज्य नाट्यस्पर्धेत भाग घ्या. अनेक जण म्हणे बाम्हनांचं काम दगड फोडणाºयांनी कशाला करायचं? वाईट वाटायचं. अनेक कलाकार नाटक सोडून जात. 1968 साली राज्य नाट्यस्पर्धेत पहिलं नाटक सादर केलं.
०    मग दादा बक्षिसांचं काय?
    - 1970 मध्ये ‘लाल कंदील’ नाटक केले. त्याला बक्षिसं मिळाली. त्यानंतर बक्षिसांची रांग सुरू झाली. त्यानंतर ‘कुशीत एका जन्म आपुला’ नाटक लिहिले.  लक्ष्मण पैठणकरांनी त्याचे खूप चांगले परीक्षण केले. पण त्यात त्यांनी आमच्या काही चुकाही छापल्या.
०    खर्चाचे कसे करायचे?
    - पहिल्या वर्षी नाटक करायला 900 रुपये लागले होते. तांबटांनी लाईटची मदत केली. चार आणे, दोन आणे गोळा केले. नाटकातील मंडळींनी  त्यावर्षी दिवाळी साजरी केली नाही. (डोळ्यात पाणी)
०    व्यावसायिक नाटकाकडे नाही वळलात?
    - काम करून, घर सांभाळून, स्पर्धा करत खरं तर नाही वळता आलं. पण त्याचं फारसं दु:खही नाही. ‘रंगदेवता उभी वादळी’ हे प्रायोगिक नाटक मात्र मी नक्कीच केलं. ‘खुनी’ नावाची एकांकिकाही केली.
०    निर्व्यसनींचे मंडळ अशी विजय नाट्य मंडळाची ख्याती आहे...
    - आमच्या घटनेतच तसे लिहिले आहे. एकदा मंडळाचा अध्यक्ष दारूच्या आहारी गेला. तो अध्यक्ष होता, पण नाटकाची सूत्रे माझ्याकडे होती. लिहिलेले मीच होते. त्याची मुख्य भूमिका असतानाही मी कापली आणि नाटक केले. निर्व्यसनामुळेच गेली 45 वर्षे श्रीराम विद्यालय आम्हाला तालमीसाठी जागा देते.

किस्से
 आचार्य अत्रेंचे ‘कवडी चुंबक’ नाटक बसविले होते. ते सेंट्रल जेलमध्ये करायचे होते. कोणीतरी म्हणाले की, लेखकाची परवानगी घेतली आहे का? त्याच वेळी जेलच्या आसपासच कुठेतरी त्यांचे भाषण होते. मग आम्ही जुने नाटक मेकअप करता करता म्हणालो. तेच सादर केले. त्यावेळी कवडी चुंबक केलेच नाही.

एकदा नांदूरला नाटक असताना ते लोक म्हणे, ‘शेतातच नाटक करा’. किमान एखादा उंच ओटा तरी हवा ना! मग ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ‘सुभेदाराची सून’ हे नाटक सादर केले.


पत्नीची आठवण येते
    - माझ्या या कारकीर्दीत कुटुंबाची मोठी साथ मला मिळाली. नाटक करायचो तर 11 रुपये पूर्ण नाटकाला मानधन मिळायचे. त्यातच पत्नी फार आजारी पडली. तिला स्मृतिभ्रंश झाला. मुलं मात्र मोठ्या कष्टाने शिकली. आज पत्नी बरोबर नाही. तिची आठवण येणारच..

No comments:

Post a Comment