Monday, 22 April 2013

स्त्री नाट्य मंडळींची शतकपूर्ती


- निवृत्ती शिरोडकर

महाराष्ट्रात व्यावसायिक रंगभूमीवर १00 वर्षांपूर्वी जेव्हा स्त्री पात्रे पुरुष रंगवायचे तेव्हा गोव्यातील पार्सेसारख्या एका छोट्याशा खेडेगावात क्रांती म्हणावी अशी घटना २७ एप्रिल १९१३ रोजी घडली आणि ती घटना म्हणजे स्त्री संगीत नाटक मंडळीची स्थापना. या नाटक मंडळीचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष पात्रेही स्त्रियाच रंगवायच्या. या अभूतपूर्व घटनेला १00 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने..

देशाच्या नकाशावर ठिपक्याएवढय़ा असणार्‍या गोव्याने कलेच्या क्षेत्रात मात्र आभाळाएवढी कामगिरी केली आहे. नररत्नांची खाण असणार्‍या गोव्याने अनेक कलाकार महाराष्ट्राला दिले. महाराष्ट्र गोव्याच्या गळ्य़ाने (लता मंगेशकर) गातो असे म्हटले जाते, ते उगीच नाही. भारतीय चित्रपटाची गेल्यावर्षीच शतकपूर्ती झाली. भारतीय नाटकानेही शतक पार केले आहे. महाराष्ट्रात व्यावसायिक रंगभूमीवर १00 वर्षांपूर्वी जेव्हा स्त्री पात्रे पुरुष रंगवायचे तेव्हा गोव्यातील पार्सेसारख्या एका छोट्याशा खेडेगावात क्रांती म्हणावी अशी घटना घडली. आणि ती घटना म्हणजे स्त्री संगीत नाटक मंडळीची स्थापना. या नाटक मंडळीचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष पात्रेही स्त्रियाच रंगवायच्या. २७ एप्रिल १९१३ रोजीच्या या अभूतपूर्व घटनेला यंदा १00 वर्षे पूर्ण होत आहेत.
१00 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी पार्से येथे श्री भगवती मंदिरासमोरील भव्यदिव्य वटवृक्षाखाली रंगमंचावर नाटक सादर केले होते, त्याच रंगमंचावर पुन्हा १00 वर्षांनी २७ एप्रिल रोजी महिलांचे नाटक सादर होणार आहे.
वैभवशाली पेडणे महाल भौगोलिकदृष्ट्या विकासापासून वंचित असला तरी इतर क्षेत्रांत मात्र आघाडीवर. याच तालुक्यातील लहानसा गाव पार्से. दोन्ही बाजूला डोंगर व मधोमध वसलेला. पार्सेचे भगवती मंदिर तसेच ब्रह्म विष्णू महेश्‍वर मंदिरावर नजर टाकल्यास या गावचे वैभव दिसून येईल. याच पार्से गावात १९१३ साली पहिली स्त्री-संगीत नाटक मंडळीची स्थापना करून वेगवेगळ्या भागात नाटकाचे प्रयोग केवळ स्त्री कलाकारच करायचे. स्त्री कलाकारच पुरुषाची भूमिका वठवायचे. या स्त्री संगीत नाट्य मंडळीने गोवा व महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळविले होते.
डोंगराच्या कुशीतील या पार्से गावाने तशीच डोंगराएवढी माणसेही जन्माला घातली. डॉ. भाऊ दाजी लाड हे मुंबईचे शिल्पकार याच गावातले, सुप्रसिद्ध व्हायोलियन वादक पं. श्रीधर पार्सेकरदेखील इथलेच. पार्सेकर यांच्या मातोश्री हिराबाई पार्सेकर ह्या प्रमुख स्त्री कलाकार आणि उत्कृष्ट गवई होत्या. त्यांच्या अनेक भूमिका गाजलेल्या आहेत.
ताराबाई पार्सेकर यांनी आपल्या जुन्या आठवणी एका मुलाखतीत सांगितल्या आहेत. पार्से येथील बलवंत पार्सेकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे स्त्री मंडळ स्थापन झाले. पूर्वी पार्से गावातील अनेक स्त्री कलाकार विविध भागातून पुरुष मंडळींच्या नाटकात स्त्री कलाकारांची भूमिका वठवायच्या. त्या सर्व कलाकारांना एकत्रित आणून बलवंत पार्सेकर यांनी १९१३ साली पहिली पार्सेकर संगीत मंडळी नाट्य संस्था निर्माण केली. ताराबाई, काशीबाई, मनाबाई, मेनका, जयवंती, शांता ही त्या वेळची पार्सेकर कलाकार मंडळींची यादी. शांताबाई ही त्या वेळची प्रमुख स्त्री व पुरुषाची भूमिका करणारी कलाकार, त्यांच्या जोडीला हिराबाई ह्या सहकलाकार. संत तुकाराम, रामराज्य, राजे शिवाजी अशी जुनी नाटके ही मंडळी सादर करायची. गोव्याबरोबरच महाराष्ट्रातील देवगड, कुडाळ, मालवण, रत्नागीरी, वेंगुर्ला या भागात नाटकांना अफाट गर्दी असायची.
संसार नाटकाबरोबरच या मंडळींचा संसार नाटकाबरोबरच. गोवा, महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रयोग व्हायचे. त्यामुळे १५-१५ दिवस दौर्‍यावरच राहावे लागायचे. त्यामुळे आपल्यासोबत बिर्‍हाडही हलवावे लागे. नाट्यप्रयोग हाऊसफुल्ल झाला तरी कलाकारांच्या हाती मानधनाच्या रूपात अत्यल्प बिदागी येई. ताराबाई पार्सेकर यांनी तर वयाच्या ८ व्या वर्षी नाट्यक्षेत्रात पदार्पण केले होते. संपूर्ण नाटकाला २00 रुपये मिळायचे. त्यात पडदे, इतर तांत्रिक अडचणी आणि कंपनीचे मालक तर त्या वेळी नाटकाचे मानधन कलाकाराच्या हातात देण्याऐवजी थेट घरी आईवडिलांकडे द्यायचे. या नाटक कंपनीकडे पूर्वी देखील चांगले पडदे, सामग्री, वेशभूषेसाठी लागणारे ड्रेस, साहित्य, इतर सुविधा होत्या. तरीही बदलत्या काळानुसार यशापयश पचवावे लागायचे. नाटकात सुधारणा
स्त्री संगीत नाटक मंडळीने सादर केलेली नाटके गाजू लागली. त्यामुळे नाटक मालकांचाही उत्साह वाढला. नवनवीन प्रयोगाची संधी मिळाली. नवीन विषय, नवीन आशय घेऊन व नाट्यप्रेमींची नाडी ओळखून नारायण पार्सेकर व बाळा पार्सेकर या कंपनीच्या मालकांनी बदलत्या काळानुसार कंपनीत सुधारणा करून स्त्री संगीत मंडळीत पुरुष पात्रे आणली. त्यात वालावालकर, कृष्णा कोठवाळे, जीवबा गाड हे पुरुष कलाकार या नाटकात भूमिका करू लागले. नाटके चालत होती. नियतीला यश पाहता आले नाही. कंपनीत भांडणे वाढली. ही भांडणे मिटविण्यासाठी परशुराम बुवांनी परिश्रम घेतले. मात्र त्यांना यश आले नाही. १९३१ साली ही पहिली स्त्री नाटक मंडळी कंपनी देवगडमध्ये (महाराष्ट्र) फुटली. प्रमत्र मोहिनी या नाटकाचा या कंपनीने शेवटचा प्रयोग केला होता.
१८५६ साली नाटक संस्था स्थापन

मुंबईचे शिल्पकार व पार्सेचे सुप्रसिद्ध डॉ. भाऊ दाजी लाड यांनी १८५६ साली कालिदास सोसायटी नाटक कंपनी मुंबई येथे स्थापन केली होती. नाना शंकर शेट यांच्या सहकार्याने राजा, गोपीचंद ही दोन्ही नाटके मुंबईला या संस्थेमार्फत केली.
शतकपूर्तीनिमित्त प्रयोग : मांद्रेकर
गोमंतक मराठा समाज पेडणेचे प्रमुख अशोक मांद्रेकर यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की पूर्वी व आताही गोमंतक मराठा समाजातील स्त्री कलाकार नाटकात काम करतात. १00 वर्षांपूर्वी जी स्त्री नाटक मंडळीची स्थापना झाली तीही याच समाजातील स्त्री कलाकारांना घेऊन झाली होती. शतकपूर्तीनिमित्त याच समाजातील गोवा व महाराष्ट्रात विखुरलेल्या स्त्री कलाकारांना एकत्र आणून यंदा प्रयोग करण्याचा संकल्प होता. मात्र ते शक्य झाले नाही. आता वळवई (गोवा) येथील नाट्यमंडळी हा प्रयोग सादर करणार आहे.
पार्से गावाने नाट्यपरंपरा टिकवली -कळंगुटकर
पार्से गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ कलाकार गणपत कळंगुटकर यांनी याविषयीची माहिती देताना सांगितले की, १९१३ साली या स्त्री कलाकारांचा पहिला नाट्यप्रयोग भगवती मंदिरासमोरील वडाच्या झाडाखाली दगड लावून रंगमंच तयार केला होता. आता त्या रंगमंचाची सुधारणा करण्यात आली असून याच रंगमंचावर १00 वर्षांनंतर प्रयोग होणार आहे

Friday, 19 April 2013

हौशी रंगकर्मींसाठी ‘कालिदास’ झाले स्वस्त

नाट्यपरिषद भरणार डिपॉझिट
नाशिक : हौशी रंगकर्मींना आर्थिक अडचणीपोटी कालिदास कलामंदिरात प्रयोग लावताना येणारे अडथळे दूर होणार आहेत. त्यासंबंधीच्या अडचणी
 लक्षात घेऊन अखिल भारतीय नाट्यपरिषदेने महाकवी कालिदास कला मंदिरचे डिपॉझिट स्वत: भरण्याची जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले होते. नाट्यपरिषदेने हा शब्द खरा केला असून, हौशी रंगकर्मींसाठी कालिदास स्वस्त दरात खुले झाले आहे.
येत्या काही दिवसांत एका नाट्यसंस्थेचा प्रयोगही लागणार असून, त्यासाठी कालिदासचे डिपॉझिट नाट्यपरिषदेने भरले आहे. सहा हजार रुपये कालिदासच्या डिपॉझिटमध्ये नाट्यपरिषदेने टाकले आहेत. आता नाट्यसंस्थेस केवळ 1700 रुपये प्रयोगासाठीचे भाडे द्यावे लागणार आहे. यात सातत्य राहिल्यास हौशी रंगकर्मींसाठी नाटकासाठी पोषक असलेले कालिदास नाट्यगृह कमी दरात खुले राहणार आहे. याशिवाय नाट्यपरिषदेच्या नव्या पदाधिकार्‍यांनी कामात वेग आणला असून, लवकरच बालनाट्य शिबिर व पुढील महिन्यात एकांकिका स्पर्धेचे आयोजन होणार आहे. महिन्याअखेरीस मध्यवर्ती कार्यालय स्तरावर रंगकर्मींची बैठक घेऊन त्यांना येणार्‍या अडचणी, सुधारणा, नवीन योजना याबाबत चर्चा केली जाणार आहे.

Tuesday, 2 April 2013

हिमालयाच्या मदतीला धावलेला ‘सह्याद्री’ उपेक्षितच

जब्बार पटेल, अशोक हांडे यांचे यशवंतराव चव्हाणांवरील  नाट्यप्रयोग, चित्रपट, अडगळीतच
नम्रता भिंगार्डे । मुंबई    

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सरकारने दोन महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांमध्ये लक्ष घातले होते. त्यांच्या जीवनावर आधारित अशोक हांडे यांच्या ‘मी यशवंत’ या दृकश्राव्य महानाट्याचे सादरीकरण आणि डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट. मात्र, जन्मशताब्दी वर्ष लोटले तरीही या दोन्ही योजना कागदावरच राहिल्याने हिमालयाच्या मदतीला धावलेला ‘सह्याद्री’ उपेक्षितच असल्याचे  दिसते.
जन्मशताब्दीनिमित्त गेल्या वर्षी  100 कोटींची तरतूद करून गेट वे आॅफ इंडिया येथील  उद्घाटन सोहळ्यात यशवंतरावांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला होण्यासाठी घोषणांची आतषबाजी झाली होती. या कार्यक्रमात सादर झालेल्या अशोक हांडे यांच्या ‘मी यशवंत’ हे दृकश्राव्य महानाट्य सबंध महाराष्ट्रात आयोजित करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले. वर्षभरात ‘मी यशवंत’ हा कार्यक्रम अन्य कुठेही झाला नाही. त्याचप्रमाणे यशवंतरावांच्या आयुष्यावर बेतलेला जब्बाल पटेल दिग्दर्शित चित्रपट त्यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच नोव्हेंबर 2012 पर्यंत प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुण्यतिथी हातची गेली आणि जन्मशताब्दी  लोटली तरी हा सिनेमा अजूनही झळकलेला नाही.    
अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विनोद तावडे यांनी ‘त्या’ 100 कोटींचा जमाखर्च विचारला आणि सरकारचे प्रगतिपुस्तक चव्हाट्यावर आले. तर हिवाळी अधिवेशनातही तत्कालीन सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी अद्याप एक रुपयाही खर्च झाला नसल्याचे सांगितले होते.     
महानाट्य, सिनेमाच्या आधारे यशवंतरावांचे कार्य राज्यभर पोहोचवण्याची संधी असतानाही जास्तीत जास्त निधी हा सातारा जिल्ह्यांत खर्च केल्याची सरकारी आकडेवारी सांगते. सातारा जिल्ह्यात ‘यशवंतराव आॅडिटोरियम’ बांधण्यासाठी 10 कोटी, सातारा जिल्हा परिषदेच्या पुनर्बांधणी आणि विकासासाठी 15 कोटी, ‘कृष्णाकाठी’ स्मारक बांधण्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली. यशवंतरावांच्या नावाची निबंध स्पर्धा, वेणुतार्इंवर तयार झालेला लघुपट अशा लुटुपुटुच्या कार्यक्रमांतून यशवंतराव महाराष्ट्रभर पोहोचणार नाहीत हे मात्र निश्चित.

कार्याला मर्यादा घातल्या
४ यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात 100 कोटींचा निधी विविध योजनांवर खर्च करण्याची सरकारने गेल्या वर्षी घोषणा केली खरी, पण तो निधी कागदावरच आहे. आता 1 मार्चनंतर घाईघाईने सह्याद्रीलगतच्या चार जिल्ह्यांमध्येच यशवंतरावांचे कार्य मर्यादित करण्याचा प्रयत्न होत आहे. यशवंतरावांचे राजकीय वारसदार काहीच करत नाहीत.
विनोद तावडे, विधान परिषद विरोधी पक्षनेते

   
दुष्काळामुळे प्रयोग रद्द
४राज्याच्या सहा महसुली विभागांत ‘मी यशवंत’चे प्रयोग होणार, असे आश्वासन त्या वेळी दिले होते. मात्र, महाराष्ट्रात पसरलेल्या दुष्काळामुळे प्रयोग रद्द झाल्याचे मला सांगण्यात आले. -
अशोक हांडे

Monday, 1 April 2013

संमेलनांमधून चळवळ उभी होते हे तर "अर्धसत्य'!


सदाशिव अमरापूरकर ः भूमिकांमध्ये सारखेपणा नव्हे नावीन्य हवे


नितीन नायगावकर ः  नागपूर

  "साहित्य संमेलन असो वा नाट्य संमेलन; यापैकी कुठल्याही माध्यमातून चळवळ उभी होत नाही, तर केवळ राजकारण घडते. त्यामुळेच बहुतेक संमेलने सरकारी रूप घेऊन पुढे येतात,' असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते व
सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर यांनी व्यक्त केले.

"राजकारणी आपली पोळी भाजून घेण्यासाठी संमेलनांचा वापर करतात. देणगी दिली की, आपल्या गावी संमेलने भरविता येतात आणि प्रेक्षकही मिळतात. अलीकडेच झालेले संमेलनांचे आयोजन ताजे उदाहरण आहे. जेव्हापासून शासनाने संमेलनांना पैसा द्यायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्याचे सरकारीकरण
झाले आहे,' असे ते सांगतात. चित्रपटसृष्टीच्या शंभरीमध्ये मराठीचे स्थान कुठे आहे, असा सवाल केला असता ते म्हणाले, "या ना त्या कारणाने सरकार भरपूर प्रयत्न करते. त्याचे अगदी ताजे उदाहरण सांगता येईल.
चित्रपटसृष्टीतील पहिला "राजा हरिश्‍चंद्र' हा चित्रपट मराठीतील. त्यामुळे तीन ताज्या दमाच्या दिग्दर्शकांची निवड करून केंद्र सरकारने अर्ध्या तासाची फिल्म तयार करण्याची योजना आणली; पण फिल्मचा विषय मराठीशी संबंधित असावा, ही एक अट टाकली. चित्रपटाची भाषा कुठलीही असो; पण विषय मराठीशी संबंधित असावा, असे म्हटल्यावर अनेकांसमोर अडचणी उभ्या झाल्या. बघूया काय होते. शेवटी सरकारही दिवाळखोर आणि आपले मित्रही दिवाळखोर. कुणाबद्दल काय बोलणार?' सदाशिव अमरापूरकर भविष्यात कोणत्या भूमिकांमध्ये दिसणार? या प्रश्‍नावर भूमिकांमधील सारखेपणा मला मुळीच आवडत नाही. त्यामुळे नव्या जाणिवांच्या चित्रपटांचा मला शोध असतो, असे ते सांगतात. "पूर्वी शंभर चित्रपट यायचे तर आज 25 चित्रपट येतात. जास्त चॉईस नाही आणि तेच तेच रोल करणेही आवडत नाही. आत्ताच "होऊ दे जरासा उशीर' हा माझा मराठी चित्रपट रिलीज झालाय. त्यातील भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. शिवाय ऑस्करच्या समितीने
आपल्या डिरेक्‍ट्रीमध्ये उत्तम स्क्रीनप्ले म्हणून या चित्रपटाची नोंदही करून ठेवली आहे.'


"नव्या रंगकर्मींना संदेश देण्याइतपत मी मोठा झालेलो नाही आणि त्यांनी माझा संदेश ऐकावा, एवढे ते लहानही राहिलेले नाहीत. त्यांच्याकडे माहितीचा ओघ आहे. त्याचा उपयोग करून घ्यावा, एवढेच."

nitinnaigaonkar.blogspot.in