Monday, 1 April 2013

संमेलनांमधून चळवळ उभी होते हे तर "अर्धसत्य'!


सदाशिव अमरापूरकर ः भूमिकांमध्ये सारखेपणा नव्हे नावीन्य हवे


नितीन नायगावकर ः  नागपूर

  "साहित्य संमेलन असो वा नाट्य संमेलन; यापैकी कुठल्याही माध्यमातून चळवळ उभी होत नाही, तर केवळ राजकारण घडते. त्यामुळेच बहुतेक संमेलने सरकारी रूप घेऊन पुढे येतात,' असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते व
सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर यांनी व्यक्त केले.

"राजकारणी आपली पोळी भाजून घेण्यासाठी संमेलनांचा वापर करतात. देणगी दिली की, आपल्या गावी संमेलने भरविता येतात आणि प्रेक्षकही मिळतात. अलीकडेच झालेले संमेलनांचे आयोजन ताजे उदाहरण आहे. जेव्हापासून शासनाने संमेलनांना पैसा द्यायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्याचे सरकारीकरण
झाले आहे,' असे ते सांगतात. चित्रपटसृष्टीच्या शंभरीमध्ये मराठीचे स्थान कुठे आहे, असा सवाल केला असता ते म्हणाले, "या ना त्या कारणाने सरकार भरपूर प्रयत्न करते. त्याचे अगदी ताजे उदाहरण सांगता येईल.
चित्रपटसृष्टीतील पहिला "राजा हरिश्‍चंद्र' हा चित्रपट मराठीतील. त्यामुळे तीन ताज्या दमाच्या दिग्दर्शकांची निवड करून केंद्र सरकारने अर्ध्या तासाची फिल्म तयार करण्याची योजना आणली; पण फिल्मचा विषय मराठीशी संबंधित असावा, ही एक अट टाकली. चित्रपटाची भाषा कुठलीही असो; पण विषय मराठीशी संबंधित असावा, असे म्हटल्यावर अनेकांसमोर अडचणी उभ्या झाल्या. बघूया काय होते. शेवटी सरकारही दिवाळखोर आणि आपले मित्रही दिवाळखोर. कुणाबद्दल काय बोलणार?' सदाशिव अमरापूरकर भविष्यात कोणत्या भूमिकांमध्ये दिसणार? या प्रश्‍नावर भूमिकांमधील सारखेपणा मला मुळीच आवडत नाही. त्यामुळे नव्या जाणिवांच्या चित्रपटांचा मला शोध असतो, असे ते सांगतात. "पूर्वी शंभर चित्रपट यायचे तर आज 25 चित्रपट येतात. जास्त चॉईस नाही आणि तेच तेच रोल करणेही आवडत नाही. आत्ताच "होऊ दे जरासा उशीर' हा माझा मराठी चित्रपट रिलीज झालाय. त्यातील भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. शिवाय ऑस्करच्या समितीने
आपल्या डिरेक्‍ट्रीमध्ये उत्तम स्क्रीनप्ले म्हणून या चित्रपटाची नोंदही करून ठेवली आहे.'


"नव्या रंगकर्मींना संदेश देण्याइतपत मी मोठा झालेलो नाही आणि त्यांनी माझा संदेश ऐकावा, एवढे ते लहानही राहिलेले नाहीत. त्यांच्याकडे माहितीचा ओघ आहे. त्याचा उपयोग करून घ्यावा, एवढेच."

nitinnaigaonkar.blogspot.in

No comments:

Post a Comment