Monday, 22 April 2013

स्त्री नाट्य मंडळींची शतकपूर्ती


- निवृत्ती शिरोडकर

महाराष्ट्रात व्यावसायिक रंगभूमीवर १00 वर्षांपूर्वी जेव्हा स्त्री पात्रे पुरुष रंगवायचे तेव्हा गोव्यातील पार्सेसारख्या एका छोट्याशा खेडेगावात क्रांती म्हणावी अशी घटना २७ एप्रिल १९१३ रोजी घडली आणि ती घटना म्हणजे स्त्री संगीत नाटक मंडळीची स्थापना. या नाटक मंडळीचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष पात्रेही स्त्रियाच रंगवायच्या. या अभूतपूर्व घटनेला १00 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने..

देशाच्या नकाशावर ठिपक्याएवढय़ा असणार्‍या गोव्याने कलेच्या क्षेत्रात मात्र आभाळाएवढी कामगिरी केली आहे. नररत्नांची खाण असणार्‍या गोव्याने अनेक कलाकार महाराष्ट्राला दिले. महाराष्ट्र गोव्याच्या गळ्य़ाने (लता मंगेशकर) गातो असे म्हटले जाते, ते उगीच नाही. भारतीय चित्रपटाची गेल्यावर्षीच शतकपूर्ती झाली. भारतीय नाटकानेही शतक पार केले आहे. महाराष्ट्रात व्यावसायिक रंगभूमीवर १00 वर्षांपूर्वी जेव्हा स्त्री पात्रे पुरुष रंगवायचे तेव्हा गोव्यातील पार्सेसारख्या एका छोट्याशा खेडेगावात क्रांती म्हणावी अशी घटना घडली. आणि ती घटना म्हणजे स्त्री संगीत नाटक मंडळीची स्थापना. या नाटक मंडळीचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष पात्रेही स्त्रियाच रंगवायच्या. २७ एप्रिल १९१३ रोजीच्या या अभूतपूर्व घटनेला यंदा १00 वर्षे पूर्ण होत आहेत.
१00 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी पार्से येथे श्री भगवती मंदिरासमोरील भव्यदिव्य वटवृक्षाखाली रंगमंचावर नाटक सादर केले होते, त्याच रंगमंचावर पुन्हा १00 वर्षांनी २७ एप्रिल रोजी महिलांचे नाटक सादर होणार आहे.
वैभवशाली पेडणे महाल भौगोलिकदृष्ट्या विकासापासून वंचित असला तरी इतर क्षेत्रांत मात्र आघाडीवर. याच तालुक्यातील लहानसा गाव पार्से. दोन्ही बाजूला डोंगर व मधोमध वसलेला. पार्सेचे भगवती मंदिर तसेच ब्रह्म विष्णू महेश्‍वर मंदिरावर नजर टाकल्यास या गावचे वैभव दिसून येईल. याच पार्से गावात १९१३ साली पहिली स्त्री-संगीत नाटक मंडळीची स्थापना करून वेगवेगळ्या भागात नाटकाचे प्रयोग केवळ स्त्री कलाकारच करायचे. स्त्री कलाकारच पुरुषाची भूमिका वठवायचे. या स्त्री संगीत नाट्य मंडळीने गोवा व महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळविले होते.
डोंगराच्या कुशीतील या पार्से गावाने तशीच डोंगराएवढी माणसेही जन्माला घातली. डॉ. भाऊ दाजी लाड हे मुंबईचे शिल्पकार याच गावातले, सुप्रसिद्ध व्हायोलियन वादक पं. श्रीधर पार्सेकरदेखील इथलेच. पार्सेकर यांच्या मातोश्री हिराबाई पार्सेकर ह्या प्रमुख स्त्री कलाकार आणि उत्कृष्ट गवई होत्या. त्यांच्या अनेक भूमिका गाजलेल्या आहेत.
ताराबाई पार्सेकर यांनी आपल्या जुन्या आठवणी एका मुलाखतीत सांगितल्या आहेत. पार्से येथील बलवंत पार्सेकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे स्त्री मंडळ स्थापन झाले. पूर्वी पार्से गावातील अनेक स्त्री कलाकार विविध भागातून पुरुष मंडळींच्या नाटकात स्त्री कलाकारांची भूमिका वठवायच्या. त्या सर्व कलाकारांना एकत्रित आणून बलवंत पार्सेकर यांनी १९१३ साली पहिली पार्सेकर संगीत मंडळी नाट्य संस्था निर्माण केली. ताराबाई, काशीबाई, मनाबाई, मेनका, जयवंती, शांता ही त्या वेळची पार्सेकर कलाकार मंडळींची यादी. शांताबाई ही त्या वेळची प्रमुख स्त्री व पुरुषाची भूमिका करणारी कलाकार, त्यांच्या जोडीला हिराबाई ह्या सहकलाकार. संत तुकाराम, रामराज्य, राजे शिवाजी अशी जुनी नाटके ही मंडळी सादर करायची. गोव्याबरोबरच महाराष्ट्रातील देवगड, कुडाळ, मालवण, रत्नागीरी, वेंगुर्ला या भागात नाटकांना अफाट गर्दी असायची.
संसार नाटकाबरोबरच या मंडळींचा संसार नाटकाबरोबरच. गोवा, महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रयोग व्हायचे. त्यामुळे १५-१५ दिवस दौर्‍यावरच राहावे लागायचे. त्यामुळे आपल्यासोबत बिर्‍हाडही हलवावे लागे. नाट्यप्रयोग हाऊसफुल्ल झाला तरी कलाकारांच्या हाती मानधनाच्या रूपात अत्यल्प बिदागी येई. ताराबाई पार्सेकर यांनी तर वयाच्या ८ व्या वर्षी नाट्यक्षेत्रात पदार्पण केले होते. संपूर्ण नाटकाला २00 रुपये मिळायचे. त्यात पडदे, इतर तांत्रिक अडचणी आणि कंपनीचे मालक तर त्या वेळी नाटकाचे मानधन कलाकाराच्या हातात देण्याऐवजी थेट घरी आईवडिलांकडे द्यायचे. या नाटक कंपनीकडे पूर्वी देखील चांगले पडदे, सामग्री, वेशभूषेसाठी लागणारे ड्रेस, साहित्य, इतर सुविधा होत्या. तरीही बदलत्या काळानुसार यशापयश पचवावे लागायचे. नाटकात सुधारणा
स्त्री संगीत नाटक मंडळीने सादर केलेली नाटके गाजू लागली. त्यामुळे नाटक मालकांचाही उत्साह वाढला. नवनवीन प्रयोगाची संधी मिळाली. नवीन विषय, नवीन आशय घेऊन व नाट्यप्रेमींची नाडी ओळखून नारायण पार्सेकर व बाळा पार्सेकर या कंपनीच्या मालकांनी बदलत्या काळानुसार कंपनीत सुधारणा करून स्त्री संगीत मंडळीत पुरुष पात्रे आणली. त्यात वालावालकर, कृष्णा कोठवाळे, जीवबा गाड हे पुरुष कलाकार या नाटकात भूमिका करू लागले. नाटके चालत होती. नियतीला यश पाहता आले नाही. कंपनीत भांडणे वाढली. ही भांडणे मिटविण्यासाठी परशुराम बुवांनी परिश्रम घेतले. मात्र त्यांना यश आले नाही. १९३१ साली ही पहिली स्त्री नाटक मंडळी कंपनी देवगडमध्ये (महाराष्ट्र) फुटली. प्रमत्र मोहिनी या नाटकाचा या कंपनीने शेवटचा प्रयोग केला होता.
१८५६ साली नाटक संस्था स्थापन

मुंबईचे शिल्पकार व पार्सेचे सुप्रसिद्ध डॉ. भाऊ दाजी लाड यांनी १८५६ साली कालिदास सोसायटी नाटक कंपनी मुंबई येथे स्थापन केली होती. नाना शंकर शेट यांच्या सहकार्याने राजा, गोपीचंद ही दोन्ही नाटके मुंबईला या संस्थेमार्फत केली.
शतकपूर्तीनिमित्त प्रयोग : मांद्रेकर
गोमंतक मराठा समाज पेडणेचे प्रमुख अशोक मांद्रेकर यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की पूर्वी व आताही गोमंतक मराठा समाजातील स्त्री कलाकार नाटकात काम करतात. १00 वर्षांपूर्वी जी स्त्री नाटक मंडळीची स्थापना झाली तीही याच समाजातील स्त्री कलाकारांना घेऊन झाली होती. शतकपूर्तीनिमित्त याच समाजातील गोवा व महाराष्ट्रात विखुरलेल्या स्त्री कलाकारांना एकत्र आणून यंदा प्रयोग करण्याचा संकल्प होता. मात्र ते शक्य झाले नाही. आता वळवई (गोवा) येथील नाट्यमंडळी हा प्रयोग सादर करणार आहे.
पार्से गावाने नाट्यपरंपरा टिकवली -कळंगुटकर
पार्से गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ कलाकार गणपत कळंगुटकर यांनी याविषयीची माहिती देताना सांगितले की, १९१३ साली या स्त्री कलाकारांचा पहिला नाट्यप्रयोग भगवती मंदिरासमोरील वडाच्या झाडाखाली दगड लावून रंगमंच तयार केला होता. आता त्या रंगमंचाची सुधारणा करण्यात आली असून याच रंगमंचावर १00 वर्षांनंतर प्रयोग होणार आहे

No comments:

Post a Comment