Friday, 19 April 2013

हौशी रंगकर्मींसाठी ‘कालिदास’ झाले स्वस्त

नाट्यपरिषद भरणार डिपॉझिट
नाशिक : हौशी रंगकर्मींना आर्थिक अडचणीपोटी कालिदास कलामंदिरात प्रयोग लावताना येणारे अडथळे दूर होणार आहेत. त्यासंबंधीच्या अडचणी
 लक्षात घेऊन अखिल भारतीय नाट्यपरिषदेने महाकवी कालिदास कला मंदिरचे डिपॉझिट स्वत: भरण्याची जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले होते. नाट्यपरिषदेने हा शब्द खरा केला असून, हौशी रंगकर्मींसाठी कालिदास स्वस्त दरात खुले झाले आहे.
येत्या काही दिवसांत एका नाट्यसंस्थेचा प्रयोगही लागणार असून, त्यासाठी कालिदासचे डिपॉझिट नाट्यपरिषदेने भरले आहे. सहा हजार रुपये कालिदासच्या डिपॉझिटमध्ये नाट्यपरिषदेने टाकले आहेत. आता नाट्यसंस्थेस केवळ 1700 रुपये प्रयोगासाठीचे भाडे द्यावे लागणार आहे. यात सातत्य राहिल्यास हौशी रंगकर्मींसाठी नाटकासाठी पोषक असलेले कालिदास नाट्यगृह कमी दरात खुले राहणार आहे. याशिवाय नाट्यपरिषदेच्या नव्या पदाधिकार्‍यांनी कामात वेग आणला असून, लवकरच बालनाट्य शिबिर व पुढील महिन्यात एकांकिका स्पर्धेचे आयोजन होणार आहे. महिन्याअखेरीस मध्यवर्ती कार्यालय स्तरावर रंगकर्मींची बैठक घेऊन त्यांना येणार्‍या अडचणी, सुधारणा, नवीन योजना याबाबत चर्चा केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment