नम्रता भिंगार्डे । मुंबई

जन्मशताब्दीनिमित्त गेल्या वर्षी 100 कोटींची तरतूद करून गेट वे आॅफ इंडिया येथील उद्घाटन सोहळ्यात यशवंतरावांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला होण्यासाठी घोषणांची आतषबाजी झाली होती. या कार्यक्रमात सादर झालेल्या अशोक हांडे यांच्या ‘मी यशवंत’ हे दृकश्राव्य महानाट्य सबंध महाराष्ट्रात आयोजित करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले. वर्षभरात ‘मी यशवंत’ हा कार्यक्रम अन्य कुठेही झाला नाही. त्याचप्रमाणे यशवंतरावांच्या आयुष्यावर बेतलेला जब्बाल पटेल दिग्दर्शित चित्रपट त्यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच नोव्हेंबर 2012 पर्यंत प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुण्यतिथी हातची गेली आणि जन्मशताब्दी लोटली तरी हा सिनेमा अजूनही झळकलेला नाही.
अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विनोद तावडे यांनी ‘त्या’ 100 कोटींचा जमाखर्च विचारला आणि सरकारचे प्रगतिपुस्तक चव्हाट्यावर आले. तर हिवाळी अधिवेशनातही तत्कालीन सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी अद्याप एक रुपयाही खर्च झाला नसल्याचे सांगितले होते.
महानाट्य, सिनेमाच्या आधारे यशवंतरावांचे कार्य राज्यभर पोहोचवण्याची संधी असतानाही जास्तीत जास्त निधी हा सातारा जिल्ह्यांत खर्च केल्याची सरकारी आकडेवारी सांगते. सातारा जिल्ह्यात ‘यशवंतराव आॅडिटोरियम’ बांधण्यासाठी 10 कोटी, सातारा जिल्हा परिषदेच्या पुनर्बांधणी आणि विकासासाठी 15 कोटी, ‘कृष्णाकाठी’ स्मारक बांधण्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली. यशवंतरावांच्या नावाची निबंध स्पर्धा, वेणुतार्इंवर तयार झालेला लघुपट अशा लुटुपुटुच्या कार्यक्रमांतून यशवंतराव महाराष्ट्रभर पोहोचणार नाहीत हे मात्र निश्चित.
कार्याला मर्यादा घातल्या
४ यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात 100 कोटींचा निधी विविध योजनांवर खर्च करण्याची सरकारने गेल्या वर्षी घोषणा केली खरी, पण तो निधी कागदावरच आहे. आता 1 मार्चनंतर घाईघाईने सह्याद्रीलगतच्या चार जिल्ह्यांमध्येच यशवंतरावांचे कार्य मर्यादित करण्याचा प्रयत्न होत आहे. यशवंतरावांचे राजकीय वारसदार काहीच करत नाहीत.
विनोद तावडे, विधान परिषद विरोधी पक्षनेते
दुष्काळामुळे प्रयोग रद्द
४राज्याच्या सहा महसुली विभागांत ‘मी यशवंत’चे प्रयोग होणार, असे आश्वासन त्या वेळी दिले होते. मात्र, महाराष्ट्रात पसरलेल्या दुष्काळामुळे प्रयोग रद्द झाल्याचे मला सांगण्यात आले. -
अशोक हांडे
No comments:
Post a Comment